Sunday, 30 September 2012

एक फ़्रेंच कथेचा भावानुवाद :- बुल दे सुफ़..........


ह्या कथेचे नाव आहे "बुल दे सुफ़" म्हणजेच इंग्रजीत "बटरबॉल" अन मायबोलीत बोलल्यास "चरबीचा गोळा". युद्धकालिन फ़्रेंच मध्यमवर्गावर प्रकाश टाकणारी ही कथा समाजवादासोबतच वर्गविग्रह इत्यादी तात्कालिन फ़्रेंच समाजातल्या प्रॉब्लेम्स वर प्रकाश टाकत एक मनुष्य स्वभावाचा मासला देखील ठरते........ लेखक :- हेन्री रेने गाय दे मोपासां....... मी मुळ संकल्पना अन ढाचा तोच ठेवायचा प्रयत्न करुन ह्या नितांत वास्तवदर्षी कथेची पुनर्निर्मिती करायचे धैर्य केले आहे...... जसं जमलंय घ्या गोड मानुन.....
आज सकाळपासुनच रोवेन गावावर मळभ पसरल्यागत होत होतं...... इतकं की कसतरीच व्हाव...... भकास काळ्याढगांनी अवघा आसमंत व्यापलेला होता सकाळच्या बेल्स पण अश्या वाटत होत्या जसे की आज येशु ची पण लेकरांशी संवाद साधायची इच्छा नाही असे भासत होते....... त्या मध्ययुगीन कथेड्रलच्या उजव्या बाजुला असलेल्या गावच्या कब्रस्तानातला कावळ्यांचा दंगा आज कानाला विशेष जाणवत होता..... नीरव भकास शांतता हेच काय ते सर्वव्यापी होते..... अपवाद फ़क्त चर्च चे पोर्च होते.
हातात कातडी आवरणाच्या रिव्हिटे मारलेल्या पट्ट्यांनी आवळलेल्या सुटकेसी सावरत तिथे काही माणसे उभी होती..... काही म्हणजे नेमकी सहा माणसे....... ह्यात सिस्टर अनास्तासिया अन क्लाऊडीन ह्या दोन नन्स.... गावातच सावकारीचा धंदा करणारे वयस्कर असे मिस्यु पेनॉं अन मिसेस पेनॉं अन त्यांच्याच बाजुच्या पेढीत कारकुन म्हणुन काम करणारे मिस्यु ले मार्तिन अन मिसेस ले मार्तिन होत्या...... वातावरणाप्रमाणेच मनांवरपण मळभ साचलेलं ह्या सहाजणांच्या चर्या पाहुन सहज कळुन येत होतं..... बरोबरच होतं म्हणा फ़्रॅंको-प्रशियन युद्धाचा तो धामधुमीचा काळ होता , जर्मनांनी फ़्रांस वर आक्रमण केलेलं होत अन काल परवाच ते रोवेन च्या पंचक्रोशित अवतरले होते आता गावात कधीपण येतील असे काहीलोक दबक्या आवाजात बोलत होते, म्हणुन वर उल्लेखलेल्या सहा लोकांनी जीवितास्तव गाव सोडुन तुलनेने शांत अश्या ली हार्व गावाकडे प्रस्थान ठेवायचं ठरवलं होतं
"काय तर बाई बेजबाबदार आहे हा मेला पिंटो!!!!" सिस्टर अनास्तासिया पुटपुटली
"हो ना सिस्टर, हे खालच्या थरातले लोक तुम्हाला सांगते, रॉबेस्पियर गेला तेव्हा पासुन माजलेत.... ते आजतागायत माजलेलेच आहेत .... म्हणे लोकशाही" मिसेस पेनॉंनी त्यांचे ठेवणीतले "किचन पॉलिटिक्स" चे मत दामटले.... तेव्हा सिस्टर क्लाऊडीन रोझरी जपत बसल्या होत्या त्यांनी मिष्किल हसत त्यांच्या मताला अनुमोदन दिले
"ह्या भडव्या पिंटोला ठरल्यापेक्षा १० फ़्रॅंक्स कमीच द्यायला हवेत आपण" असे म्हणतानाच प्रभूच्या पायरीवर आपण आवेषात दिलेल्या शिवीचे मिसेस ले मार्तिनांच्या वटारलेल्या डोळ्यातन पडसाद आल्याचे दिसल्यामुळे मिस्यु मार्तिन ओशाळुन तिसरीच कडे पहायला लागले.........
बायकोचा दरारा काय असतो हे एरवी ज्यांच्याकडे पाहुन कळावे असे मि.पेनॉं तेवढ्यात स्मित करत म्हणाले.... "१० कमी द्या किंवा जास्त हा सैतान १०० वर्षं जगणार हे मात्र नक्की!!!!!" सगळ्यांनी चमकुन चर्चच्या बिडाच्या मोठाल्या फ़ाटकाकडे पाहीले तर पिंटो त्याची बग्गी जोरात हाकत आत शिरत होता....
कालच पडलेल्या बर्फ़ामुळे झालेल्या रेंद्यातुन गाडीच्या चाको-या जणु त्या लोखंडी पट्टी मारलेल्या लाकडी चाकांना घट्ट धरुनच होत्या......... चर्च च्या पायरीशी बग्गी थांबताच पिंटो हुषारीत उडी मारुन खाली उतरला अन टोपी काढुन समस्त स्त्री वर्गास त्याने एक प्रोफ़ेशनल "बॉन्जुर" घातला, त्याकडे दुर्लक्ष करत आत्ता पर्यंत शांत असलेल्या मिसेस ले मार्तिन फ़णकारल्या व
"मेल्या कुठल्या पब मधे शॅंपेन ढोसत बसला होतास सकाळी सकाळी "अशी पृच्छा करु लागल्या
"ह्यांना शॅंपेन परवडते??? अन प्रभूच्या दानपेटीत एक फ़्रॅंक टाकायला सांगा रडकं तोंड करुन उलटं धर्मदाय बॅग्वेट ब्रेड चा लोफ़ मागुन नेतील मेले" हा सिस्टर क्लाऊडीनने "चर्चचा आहेर" दिला.....
थोरामोठ्यांच्या घरच्या दिड शहाण्या तोंडाळ बायकांचा पुरेपुर अनुभव असणा-या पिंटो ला सिस्टर क्लाऊडीनांचे नन व्हायच्या आधीचे दरकदारी पार्श्व माहित असल्यामुळे त्याने त्या सगळ्या कुजकटपणाकडे दुर्लक्ष केले अन सराईत पणे लवुन नमस्कार करत माफ़ीच्या सुरात मि.पेनॉंना म्हणाला
"माफ़ी असावी मेहेरबान.... एका चाकाचा स्पोक तुटला ते चाकच बदलुन यायला उशीर झाला मला"
"चल आता तुझे बहाणे पुरे कर अन सुटकेसेस लोड कर.... निघायचंय आपल्याला" पेनॉंनी फ़र्मान काढले
काहीवेळातच पिंटोने सगळे सामान लोड केले व झुकत रितीप्रमाणे स्त्रीवर्गास वर चढण्यास हात दिला...... पिंटो मुळचा आयरिश पण इंग्लंडात "हमाल क्लोव्हर" अशी संभावना व्हायला लागली तेव्हा ह्याचे बापजादे रोबेस्पियर अन मॉंटेस्क्यु च्या लोकशाही प्रयोगात नशीब आजमवायला म्हणुन फ़्रेंच झालेले...... एक एक करत दोन्ही नन्स व मि.पेनॉं अन मि.ले मार्तिन अश्या वर चढल्या अन त्यांचा मागे आपला स्थुल देह सांभाळत मि.पेनॉं अन कापायला काढलेल्या कोंबडीसारखे दिसणारे मि.ले मार्तिन चढले...
बाहेर तर अंधारलेलंच होतं तेव्हा बग्गीत अगदीच यथा तथा प्रकाश होता, ते ताडुनच मि.पेनॉंनी लगबगीने त्यांच्या स्पेनिश कातडी पर्स मधुन एक मेणबत्ती काढली अन ती पेटवुन बग्गीच्या रोशनदानात लावली तेव्हाच त्यांचे लक्ष गेले ते पुरुषांच्या बाजुला सीट वर अंग चोरुन बसलेल्या तरीही जिचा स्थुलपणा लपत नाही अश्या एका स्त्री कडे....... त्यांच्या एकटक नजरेच्या रोखाकडे बघतात इतर तिघी अन पुरुषांच्या नजरापण तिकडेच वळल्या.. तशी ती बाई अजुनच अवघडल्यागत झाली.. सगळे स्थिरस्थावर झाल्याच्या अदमासाने पिंटो तेवढ्यात बग्गीचे दार लाऊ लागला
" ह्या कोण??" सि.अनास्तासियांनी तुटक आवाजात विचारले.....
"उम्म्म त्या होय, त्या आहेत मॅडम रोसेटा......... त्यापण आपल्या सोबत येणारे ली हार्व ला" पिंटो गडबडल्यागत बोलला.....
"रोसेटा म्हणजे लेक एंड ला जिचे "प्लेझर हाऊस" आहे तिच का ही बया???"
"उम्म्म मी म्हणजे हो.... पण मी......" असे काहीसे रोसेटा बोले तो पर्यंत समस्तजनांच्या नजरा अन भुवया आक्रसल्या सगळे जरा टरकुन सरकुन बसले अन अनास्तासिया पुटपुटली
"ओह गॉड फ़र्गिव्ह मी फ़ॉर द सीन"
"चला म्हणजे आपल्याला कंपनी द्यायला एक लचके तोडला जाणारा एक "चरबीचा गोळा " आहे तर" मि.ले मार्तिन आपल्या सात्विक संतापाला वाटकरुन देत बोलले अन त्यांना अनुमोदन दिल्यासारखे ते अन मि ले मार्तिन पिंटो कडे पहायला लागले.....
पिंटो ने एकदाच दयेने रोसेटा कडे पाहीले ती शांत असल्याचे पाहुन तो कसनुसे हसत कोचवानाच्या जागेवर उडी मारुन बसला अन बग्गी भरधाव सोडली...... बग्गी सुटली तश्या विखारी बुर्झ्वा जिभा अन "गप्पा" पण सुटल्या
"तुम्हाला सांगते मी मंडळी, मागल्या जन्मी मरणाची पापे केली की हा जन्म असा मिळतो बघा" अनास्तासिया बोलली
"मग काय, आधीच चरबीचा गोळा त्यात माहित नाही किती रोगट असेल हा गोळा" मि.पेनॉंनी आपल्या हॅंड बॅगेतली साबणाची वडी चाचपडत शेरा मारला, ह्या वेळी रोसेटा निर्विकार होऊन बग्गीबाहेर बघत होती
"बघा बघा लाज म्हणुन काही ती नसतेच ना चरबीच्या गोळ्यांना........ काहिही बोला ह्यांना काही नाही तसेही हे गोळे म्हणजे डस्टबीन्सच असतात समाजाचे " इति श्री पेनॉं........
"हो ना हो पेनॉं, हा गोळा माझ्यापासुन दुरच ठेवा कसा....." क्लाऊडीन बोलल्या तसे रोसेटाच चपापुन थोडे अंग चोरत बसली............
"मेल्या पिंटो ने काही सवा-यांचे पैशे घेतलेत की फ़क्त एक वेळ चरबी खायला मिळाली म्हणुन जागा दिलीए ह्या गोळ्या ला देव जाणे" मि.पेनॉं बोलल्या......
तास दिड तास असाच गेला तेव्हा गाडी थांबली , पिंटो उतरला अन लगबगीने मिस्यु.पेनॉं बसले होते त्या खिडकी जवळ येऊन म्हणाला "मेहेरबान आपण आपला नाश्ता गाडीतच उरकावा ही विनंती, धुक्यामुळे आपण तसे ही स्लो आहोत अन रात्रीच्या आधी आपल्याला ली हार्व ला पोचायचेच आहे"
असे ऐकताच काय ही कटकट आहे अश्या भावनेने त्रासलेल्या पेनॉंनी समस्तांकडे न पाहताच "हूं" केले व गाडी तडक पुढे सरकली..... अश्यातच लोकांच्या भुका खवळल्यावर लक्षात आले की मधे कुठेतरी थांबायचे म्हणुन आज कोणीच घरी ओव्हनची भट्टी पेटवलीच नव्हती... चर्च चा किचन स्टाफ़ पण युद्धाच्या धामधुमीत काम सोडुन गेला होता, आता चरफ़डत बसणे खेरीज कोणाकडे काही इलाज नव्हता..... अन तितक्यात उमद्या चीज अन ताज्या ब्राऊन ब्रेड चा सुगंध दरवळायला लागला तसे लोकांची आशाळभूत नजर तिकडे वळली, रोसेटा ने आपली पिकनिक बास्केट उघडली होती......
अतिशय सहज अन सच्चा असा एक आवाज घुमला "घ्या ना सिस्टर ,मिस्यु ऍंड मिसेस.... प्लिज थोडी ब्रेड खाऊन घ्या बरे वाटेल जीवाला सगळ्यांना अन मला पण आनंद होईल".... ती रोसेटा होती....
"ए... बये वेड लागलंय काय???....... तुला हजार रोग असणारी तु पापी विच, आम्ही का तुझ्या तुकड्यांचे सेवन करणार की काय??? मेला चरबीचा गोळा" क्लाऊडीन उचकल्या.........
"हो ना मेली दोन घास खायला घालुन काय मोठे पाप धुवुन घेणार आहे देव जाणे" मि.ले मार्तिन बोलल्या
तसे रोसेटा गप्पगार झाली तिची भुकेची संवेदनाच मेली अन तिने ते बास्केट तसेच सरकवले, काहीवेळानंतर जसे जसे पोटातला भडाग्नी अजुन पेटला तश्या जिभा लुळ्या पडु लागल्या ........ शांततेचा भंग करत क्लाऊडीन पहीले बोलल्या
"तसं ब्रेड अन वाईन शुद्ध अन्न असतं नाही का हो सिस्टर अनास्तासिया???....."
"तर काय, लास्ट सपर मधे पण प्रभू ने तेच खाल्ले होते, ते पण मेरी मॅग्डेलन ला शेजारी बसवुन"
अतिशय तत्परतेने रोसेटाने ब्रेड लोफ़ अन रेड वाईन क्लाऊडीन ला दिली ती हातात घेऊन मानभावीपणे सिस्टर इतरांना म्हणाली "घ्या मंडळी थोडे खाऊन घ्या , तेवढेच चरबीच्या गोळ्याला पुण्य लाभेल माय पायस फ़ॉलोवर्स ऑफ़ लॉर्ड"...... हळु हळु अन्नवासनेला "प्रभूची इच्छा" "चरबीच्या गोळ्यावर उपकार" इत्यादी विशेषणं लाऊन का होईना अन्नाचा पार चट्टामट्टा झाला....
असेच घड्याळाचे काटे सरकत राहीले ,तसे थोड्या वेळाने पिंटो खाली उतरला व मिस्यु पेनॉंना बोलला " मेहेरबान आज रात्री तर आपण ली हार्व ला पोहोचणे मुष्किल आहे, इथे जवळच एक कॅरीयर इन आहे तिथे आपण रात्री राहू शकु, अन पहाटे लवकर उठुन परत पुढे निघु"
"काय कट्कट आहे, पिंटो तुला अजिबात गाडी हाकता येत नाही!!!!.... आता काय जे पुढ्यात येईल ते करणे अजुन काय, टेक अस टू द इन यु रब्बीश आयरीश पोर्टर"
चेहरा पाडुन पिंटोने गाडी आस्ते आस्ते इन च्या दारात नेऊन थांबवली, सामान उतरवुन आत नेले, रिसेप्शन ला मि.पेनॉ पोचले तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला..... मागे एक जर्मन निषाण होते
"हे हो काय????" मागुन येऊन चकित झालेल्या मिस्यु ले मार्तिनांनी विचारले......
मख्ख तोंडाने रिसेप्शनिस्ट बोलला" काल रात्रीच जर्मनांनी ताबा घेतलाय इन चा..... तुम्ही आधी त्यांच्या मेजर ला भेटुन घ्या कसे"
सगळी वरात तशीच पहील्या मजल्यावर चालवली गेली, वर घेऊन जाणारा एक कप्तान होता तरणा जर्मन ठेवणीचा दणकट चेहरा ,युद्धाने रापलेला रंग अन रुंद जबडा असणारा, तो टकटक करुन एका खोलीत गेला बंद होणा-या दारातुन प्रत्येकाला टक्कल पडलेला निळ्या डोळ्यांचा त्याचा वरिष्ठ दिसला, काही क्षणातच कप्तानाने त्यांना आत बोलावले अन ओळख करुन देण्यासाठी बोलला
"सिटोयेन्स एंड सिटोयेनेस, मेजर हान्ज क्रेपे ऑफ़ प्रशियन आर्मी बाय द कमांड ऍंड कमिशन ऑफ़ आर्च ड्युक ऑफ़ प्रशिया"
"वेलकम सिटीझनरी, बी काल्म ऍंड कंफ़र्टेबल....... निश्चिंत असा..... तुम्ही सेफ़ आहात....... मी मे.क्रेपे तुमचे स्वागत करतो....... आपला परिचय करुन द्यावा अशी मी आपणा सर्व मिस्टर्स ,मिसेस ऍंड मॅड्मोसेल्स ना विनंती करतो"
मंडळी इतक्यात बरीच रिलॅक्स झाली होती, सगळ्यांच्या ओळखी झाल्या तसे सगळे थोडे पाघळले होते "काय पण सुसंकृत सैनिक आहे हा" असे मि.पेन मि ले मार्तिनांच्या कानी लागुन सांगत होत्या...... इतक्यात काहीसे चमकुन क्रेपे रोसेटा ला म्हणाला
"माफ़ करा मॅड्मोसेल आपली तारीफ़ काय म्हणालात आपण??"
"उम्म्म मी मॅडम रोसेटा, लेक व्यु इस्टेट रोवेन ची मालकीण.........."
"ओहो, तुमचे प्लेझरहाऊस बरेच प्रसिद्ध आहे मड्मोसेल" क्रेपे......
"ठीक आहे तर मग ठरले, मला मॅड्मोसेल रोसेटांची पुर्ण सर्व्हिस मनसोक्त मिळाली तर उद्या सकाळीच तुम्ही बग्गी जोडुन ली हार्व ला रवाना होऊ शकाल नाही तर इथे थांबा आमचे मेहेमान म्हणुन" असे म्हणत क्रेपे उठला अन बाहेर जाऊ लागला
"नीच नराधम पाप्या, माझ्याच देशावर आक्रमण करुन मलाच शरीरसुखाची मागणी करणारी खरंच ऑस्ट्रीय्न अवलाद आहे की बार्बेरियन????" रोसेटा कडाड्ली होती.......
"मड्मोसेल, इंपल्सिव्ह होऊ नका, पुर्ण विचार करा, मला काही घाई नाहीए..... पण विचार करा" छ्द्मी हसत क्रेपे बोलला अन दार लावल्यावरच सुन्न झालेली रोसेटा जाग्यावर आली.......
सगळी खोली आपल्याकडे विचित्र नजरेने बघते आहे असे तिला वाटुन गेले अन ते खरे होते, उरलेले सहा भुवया ताणुन तिच्याकडे पाहात होते अन फ़क्त पिंटो गाडीवान समयोचित करुण नजरे ने तिला सांत्वना देत होता...... सगळे खोलीत शांत बसले होते
"मड्मोसेल रोसेटा, विचार करा आपण सारे फ़्रेंच नागरीक आहोत, आपल्या सगळ्यांचा जीव आज राष्ट्रासाठी महत्वाचा आहे तुमच्या क्षणिक त्यागामुळे काही तरी चांगले घडू शकते, तरी तुम्ही प्लिज क्रेपे ची इच्छा पुर्ण करा अन आपणा सर्वांनाच ह्याच्यातुन मुक्त करा" असं जेव्हा श्रीयुत पेनॉ म्हणाले तेव्हा श्रीयुत ले मार्तिन त्यांना अनुमोदन देत मान हलवत होते, कापायला काढलेल्या बोकडागत दोघांच्या डोळ्यात अजीजी होती
"बेटा, तु त्याची इच्छा पुर्ण करुन इश्वराचे काम करतीएस ,लक्षात ठेव, तु जितक्या लवकर त्याला त्रृप्त करशील तितक्या लवकर आपण इथुन निसटू अन तितक्या लवकरच आम्हाला नन्स म्हणुन जखमी फ़्रेंच लेकरांची सेवा करता येईल अन सैनिकांची दुआ तुला लागेल...... येशु ची तु लाडकी होशील पोरी" अनास्ताशिया च्या ह्या बोलण्यावर क्लाऊडीन "नैले पे दैला" सारखी नजर करुन आलटुन पालटुन तिच्याकडे अन रोसेटाकडे पाहु लागली
"दया करा मड्मोसेल, आम्ही मेलो तर ब्रिनीच्या लष्करी शाळेतली आमची कच्चीबच्ची अनाथ होतील हो...." असे म्हणतच दोन्ही बाया भोकाडूं लागल्या...... तसे रोसेटा निश्चयाने उठुन म्हणाली ,
"आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी मी एका राष्ट्रशत्रु सोबत शय्यासोबत करेन"
तिचे बोलणे ऐकताच खोलीत वसंत फ़ुलला, जितका उतावळा क्रेपे तिला भेटायला नव्हता तितके उतावळे सगळे तिला त्याच्या खोलीत धाडायला झाली, एकटा पिंटोच बेचैन झाला होता..... काही वेळाने सांज ढळली तेव्हा तिला क्रेपेच्या खोलीत धाडण्यात आले.....
सगळी मंड्ळी आपापल्या खोल्यांत निवांत पहुडली होती, तिघंच जागे होते, लचके तोडणारा क्रेपे, रोसेटा अन समाजाच्या दंभाचा उबग आलेला अन वरच्या खोलीतनं आलेले उसासे ब्रॅंडीच्या खळखळाटात विरघळवु पाहणारा सहृदयी गाडीवान पिंटो.........
सकाळ झाली ,
ताजी तवानी झालेली मंडळीच क्रेपे बरोबर काळा चहा अन क्रॉइसांट्स चा नाश्ता करत होती, त्यांचा नाश्ता होई पर्यंत पिंटो ने गाडी तयार केली, अतिशय सभ्यपणे क्रेपे ने समस्तांस गुडबाय केले, अन आपण काहीतरी विसरतो आहोत हे विसरुन ही मंडळी सुहास्य वदने गाडीत स्थानापन्न झाली...... आज सकाळीच मिसेस ले मार्तिनांनी डोके लाऊन भरपुर ब्रेड अन वाईन अन अंड्यांचा खाऊ सोबत बांधुन घेतला होता , एका कोप-यात कशीबशी पाय ओढत आलेली रोसेटा बसली होती ,रात्रभर रडल्यामुळे तिचे डोळे सुजले होते, कोलमडलेल्या तिला तहानभूक अन शिदोरीच काय पण अंगावरच्या फ़ाटक्या झग्यातनं दिसणा-या व्रणांची ही तमा उरलेली नव्हती....... काही वेळानी नाश्त्याची वेळ झाली तसेच भुका ही कडाडल्या तेव्हा भराभर ब्रेड अंडी मोडल्या जाऊ लागली
काल भुकेने लुळ्या पड्लेल्या जीभा परत ताठरल्या, काल रात्री भिती ने करुण झालेले जीव परत एकदा ताज्यादमाने हुषारी खाऊन पिऊन सरसावुन बसले, परत एकदा एक सामाजिक भिंत उभारली गेली जिच्या ज्या व्यवसायामुळे काल हे फ़्रेंच बुर्झ्वा जिवानिशी वाचले होते तिलाच परत एकदा
"रडायला काय ,काल रात्रीचा मेहेनताना कमी मिळाला की काय मड्मोसेलला कोणास ठाऊक ???" अशी पृच्छा ब्रेडच्या तुकड्याला मोताद ठेऊन एका नितांत सुंदर आत्म्याला केली जाऊ लागली.........
गाडीवानाच्या सीट वर बसुन पिंटो " द सॉंग ऑफ़ मार्सेल्स" म्हणजेच फ़्रेंच राष्ट्रगीत शीळेवर वाजवत होता अन तेच गीत पार्श्वभुमीवर ठेऊन बुल दे सुफ़ म्हणजेच चरबीचा गोळा विष्षण नजरेने बाहेरच्या भकास अन सुतकी आसमंताकडे पाहात एकटाच रडत होता...........

Wednesday, 14 September 2011

भय चिकित्सा..........एक भयकथा.....


"मला दारु प्यायची आहे बास!!!!!!"
अम~या रेसिडेंट क्वार्टर च्या दारातन आत येत ओरडला, आल्या आल्या त्याने ऍप्रन फ़ेकुन दिले स्टेथॉस्कोप भिरकावला दिवसभर वागवलेले ग्लॉसी फ़ॉरमल्स उतरवले व झकास बॉक्सर वर बसुन  ढेरी खाजवु लागला

"काय झाले आहे अम~या????" डॉ.भगत विचारु लागला

, हा मनुष्य भगत बाबा म्हणुन प्रसिद्ध जन्मपत्रिका पाहुन रोकठोक सडेतोड उतारे बनवणे असले उद्योग असायचे ह्याचे, सालं हे डॉक्टरांच जगच वेगळं असतं यार, काही इतके विज्ञाननिष्ठ की देवळाची पायरी पण चढणार नाही अन दुसरे असे की जे दवा सोबत दुआ च्या डोस वर पण निर्भर असतात, दुस~या प्रकारात एक आमचा भगत्या होता, अम~या आमचा बालमित्र अन भगत चुलत मित्र!!!! अम~याचा बॅचमेट!!!!!!.......

"घंटा काय होणार आहे भगत, ऑर्थोपेडिक्स घ्यायला काय आम्ही येडझवे होतो काय???? म्हणुन जनरल सर्जरीच्या पण ड्युट्या ठोकत फ़िरावे लागते आहे..... त्यात आज कहर केला रे, मावळच्या दंग्यांची बुलेट वुंड केस काल ऑपरेट केली होती मी... त्याचा फ़ॉलोअप घ्यायला डीन सोबत रोज एक नवा राजकारणी!!!!!"

"हा हा हा...... अंब्या तुझे काही खरे नाही तुला आता गर्लफ़्रेंड हवी आहे लेका हा हा हा" इति अस्मादिक

"गप साल्या, पोरीचे तर नाव पण काढु नको, आज दुपार नंतर गायनिक्स ला ड्युटी लावली  साल्यांनी..... पाच डीलिव्ह~य़ा करुन आलो आहे आता मल्लिका शेरावत आणुन दिली तरी नकोय मला.... वैताग नुसता त्या पाच डीलिव्ह~यात ३ प्रायमी"

माझी शंका उफ़ाळताना पाहुन मी अजुन शिव्या न खाव्या म्हणुन भगत्याच चट्कन म्हणाला
"प्रायमी म्हणजे पहीलटकरणी रे गु~या"

"हा ना राव, ताई पुश कर ताई पुश कर म्हणुन ओरडतोय तर नुसतीच ओरडते येडी, पोरगे का आता मी पुश करु काय"

अंब्या बेहद्द वैतागलेला होता, मी हळुच भगत्याला डोळा मारला भगत बोलला

"चल अंब्या आज दारु मी पाजतो"

ह्या डॉक्टर लोकांची साली एक मजा असते, दारु प्यायच्या आधी शर्ट वर करणार व दुस~याला सांगणार लिव्हर पाल्पेशन बघ रे!!!!, अल्कोहोल पिऊन लिव्हर पालपेट होत नाही तोवर प्या हा सर्वसाधारण नियम, मला पण चेक करतो म्हणतात मला नाही आवडत, हॉटेलात काय शर्ट वर करुन बसायचे राव!!!!!!!!
तरी अंब्या निघताना म्हणतो कसा

"गु~या तु पोलीस झाला न असे एयर फ़ायर वगैरे करायचे नाही फ़ॉरेन्सिक्स अन मेडीकोलिगल केसेस होतात मग, सरळ पॉईंट ब्लॅंक वरुन टकुरेच उडवायचे!!!!!!",

 ह्याच अंब्या ला अजुन एक आवड होती ती म्हणजे ज्या दिवशी डोके जास्त फ़िरेल त्या दिवशी सरळ वीस चा कॅनाबिस म्हणजे गांजा मारायचा, बेस्ट न्युरो रिलॅक्संट असे तो त्याचे वर्णन करायचा, कधी तरी आम्हाला पण एक जॉईंट मिळायचा, ट्रांस म्युझिक ऐकत ते जड झालेले डोके मस्त वाटायचे
भगत्याने गाडी काढली तेव्हाच अंब्या रोल बनवायला लागला होता, आज का काय माहीत पहिला मान मला होता,
 "घे गु~या कर बम बोले " मी सणसणीत घोट घेतला गांजाचा अन सरसरसरसर कणा शहारला माझा.....

 भगत म्हणाला "कुठे बसायचे रे???"

माझे स्पष्ट मत होते, साईवर्षा च्या मुतारी मागे हे संपवु, तिकडे एक एक बियर लाऊ अन मस्त जेवण करु.... पण भगत्याला मस्ती फ़ार आज कुठुन तरी नवीनच फ़ियर थेरेपी वाचुन आलेला होता,

 "ए तसले नको यार , एक काम करुयात एम.आय.डी.सी च्या मागे जाऊ पडक्या गढीत जाम मजा येते, रंग दे बसंती फ़िल येतो तिथे, तिथे बसुन भुताच्या गोष्टी करु, fear accelerates mental an neural activity hence aggrevating the cannabis kick and giving mere esctasy"

 मला तसे पुर्ण लहानपण वाडी वस्ती अन शेताडीत गेल्याने काही फ़रक पडत नव्हता परत वरतुन गांजाची मस्ती आलेली अंगात. आज का कोणास ठाऊक अंब्या थोडा अस्वस्थ वाटला

 "काय रे???" मी

 "काही नाही रे, तु पी गांजा मला नको मी नंतर फ़क्त दारुच पितो कसा"

गढी आज दुरुनच भयानक दिसत होती... भकाभक वाढलेली बोगनवेली आज त्या चांदण्यात भेसुर काटेरी वाटत होती फ़क्त, ब्युटी ऍंड द बिस्ट च्या बिस्ट चा महाल असावा तसला आलम होता, मला काय मी तर मस्त मौला होतो..... तितक्यात मला देवडी वरच कंदिल दिसला एक अन माझी अर्धी किक उतरुनच गेली,

 "हे काय रे!!!!, मी केकाटलो"

"चुप भोसडीच्या, भगत्या म्हणाला....

अंब्या शुन्यात बघत बसलेला होता, गाडीच्या मंद पिवळ्या पार्किंग लाईट मधे त्याचे तोंड पण नीट दिसत नव्हते.... भगत खाली उतरला तर एक म्हातारा होता, हातातला कंदिल पार डॊळ्याजवळ आणलेला,
"कॅटॅरॅक्ट असेल म्हाता~याला" अंब्या बोलला आज आवाज पण क्षिण होता त्याचा,

 "काय आबा, बसु का जरा??" भगत्याने विचारले

 "बसा की मालक आता मोटारीतुन आले तुम्ही म्हणजे तालेवारच नव्हं काय!!!!" असे म्हणत म्हातारा भेसुर हसला.......

 "चल रे" भगत्या म्हणाला.....

आम्ही सगळ्यात उंच बुरुजावर बसलो होतो, मी ३ अन हे दोघे दोन दोन चिलमी संपवुन बसले होते,

 "यार आज किक नाय बसली" हे माझे नेहमी चे  रडगाणे चालले होते.
भगत म्हणत होता "दारु पण इकडेच आणायला पायजे होती रे!!!" तेवढ्यात अतिशय किन~या आवाज हाक आली,

 "मालक काही सेवा लागली तर बोला , गावठी माल आहे अस्सल एकाच चिलमीत मजा देईल असा" खाली बघितले तर बुरुजाच्या पायाशी म्हणजे अंदाजे ३५ फ़ुटांवर खाली तो म्हातारा उभा होता,

 मी चेकाळुन म्हणालो "हो नाना हवंय, किती घेणार????" "पैशे कश्याला मालक फ़क्त जरा गप्पा मारत बसु" आम्ही खाली उतरलो....

 आज अंब्या जरा जास्तच शांत होता.... चौकीच्या देवडीत आम्ही बसलो.... म्हाता~याने सराईत पणे चिलिम भरली अन माझ्या हातात दिली ती घेताना मी सहज खाली पाहीले व मी गर्भगळित झालो, म्हाता~याचे पाय उलटे होते, भगत कडे डोळे विस्फ़ारुन पाहीले तर त्याची पण बोबडी वळलेली...

."अरे माझा मोबाईल बुरुजावरच राहीला चला तो शोधु" असे भगत म्हणतो आहे तोवर तो म्हातारा उठला

 "अवं अवं मालक बसा इथे मी हुडकतो की तो " असे म्हणत सरळ चालत बुरुजाच्या पायथ्याशी गेला व आपण सहज पायरी चढतो तसा ३५ फ़ुटांचा बुरुज चढला, तिथे चढुन तो गडगडाटी हसला व म्हणाला,

 "कितीतरी दिवसांनी माणसांबरोबर खेळायचा मौका आला आहे तुमची सेवा तर करावीच लागणार ह्या सुभानरावाला ह्हिह्ह्ह्हिहिहिहिहिहि"

आमचा गांजा सरर्र्रकन उतरला.... भगत्याचा हात धरला त्याला म्हणालो

 "गाडीत बसायच्या आधी मागे वळुन पाहीले तर मरु, चल पळ आता"...

पुढे बघतो तर काय, शेकोटीच्या प्रकाशात अंब्या स्पष्ट दिसत होता.... फ़क्त त्याचे डोळे आता गुंजेसारखे लाल भडक होते,

 "थांबा "तो एखाद्या टीनेजर च्या आवाजात बोलला......

"बाहेर पडला तर सुभाना जीव घेईल तुमचा अडकाल असेच माझ्यासारखे ह्या गढीत सुकाळीच्यांनो....."

 "तु कोण आता, आमचा अंब्या कुठंय????" भगत्या अवसान आणुन म्हणाला,

 "माझे नाव यशवंत, गढी माझी होती.... पण भाऊ बंदकीत गेली, माझ्या वडलांनंतर काकांनी बळकावली व अश्याच एका रात्री ह्याच सुभान्याच्या हातुन माझा मुडदा पाडला " तेव्हा पासुन मी त्याला अन तो मला ह्या गढिबाहेर हुसकायचा प्रयत्न करतो आहे...."

आम्ही पुरते सर्दावलो होतो........ "मला कश्याला घाबरताय, अंब्याच्या अंगातला यशवंत म्हणाला..... मी वाचवतो तुम्हाला...."

असे म्हणताना जे एक विशिष्ट स्माईल असते ते देत होता अंब्या/यशवंत...... ओठांची दोन्ही टोके वर वळलेली पांढरे दात दाखवत, डोळे ताणत तारवटत बोलत होता तो!!!!! अगदी बॅटमॅन मधल्या जोकर सारखा.......

 "आता मी सुभानाला खाली बोलवतो आहे, भगत मला माहित आहे तुझ्या खिशात अंगारा असतो मी सुभानाला पकडला की तो त्याच्या अंगावर फ़ुकायचा कळले काय????" आम्ही हो म्हणालो मी बघत होतो, भगत तयार होता....
"सुभान्या ये इकडे गद्दार कुळीच्या".......

"आलो यशवंत मालक"
ते म्हातारं (?) हाताला फ़ेव्हिकॉल चिकटवल्या गत बुरुजाच्या भिंतीला चिकटतच खाली आले...... मी थरथरत होतो, जसे ते म्हातारे जवळ आले, भगत्याने अंगारा फ़ुंकला त्याबरोबर ते बुढघे पेट्रोल टाकल्यागत पेटले व सुड सुड करत जळाले, पाव मिनिटातच आम्ही जिंदगी बघितली आई बाबा बहीण सगळे एकदम आठवले आम्हाला,

आता अंब्या भेसुर हसत होता गढीभर धावत होता क्षणात बुरुजावर चढत होता क्षणात विहिरित उडी घेत होता ओलाच बाहेर येऊन परत गढीच्या पांढ~या मातीत गडाबडा लोळत होता व किन~य़ा आवाजात ओरड्त होता

"आबा आबा बघा गढी परत आपली आहे आबा आबा"

मी हिंमत केली व म्हणालो "यशवंत राव, आता आमच्या दोस्ताला सोडा कसे तुम्ही"

ते तो एकदम तुच्छते ने माझ्या कडे पाहात हसु लागला अगदी तसाच ओठांची दोन्ही टोके डोळ्यांकडे वळवुन डोळे तारवटत......

"अरे हाड", तो म्हणाला...." इतकी वर्षे त्या पिंपळावर बसलो  होतो मी, आज तुमचा मित्र त्या पिंपळाच्या बुंध्या वर मुतला अन मला झाड मिळाले आहे लटकायला.... अन हे मला लाभले पण आहे, मी नाही ह्याला सोडणार जा चालते व्हा, आता मी ह्याला विहरीत बुडवुन मारणार अन ह्याच्या कुडीत कायमचा राहणार माझ्या गढीत..... हिहिहिहिहिहिहिहिहिइह"

परत भेसुर हसणे, मी भगत्याकडे पाहीले त्याचा अंगारा संपला होता घाईत त्याने सगळा अंगारा सुभानरावावरच उधळला होता.... आम्ही काय करावे ह्या विचारात होतो तोवरच यशवंत अंब्याला घेऊन देवडीतल्या कपडे टांगायच्या खुंटीवर चढुन बसला होता..... ८० किलो चे एक पोरगे प्लास्टीक चे असल्यागत कधी छपरापर्यंत वर जायचे कधी खुंटी वर चढुन बसायचे, इतक्यात भगत चमकला माझ्या हाता कडे पाहु लागला व लगेच माझ्या डोक्यात प्रकाश पडला कारण माझ्या हातात होते अस्सल पंच धातुचे पंचमुखी हनुमानाचे कडे, तेव्हा मला कळले मला कुठल्याच भुताने का धरले नव्हते.... कारण मी कड्याच्या अन भगत्या अंगा~याच्या कवचात होतो, उरला होता एकटा नास्तिक अंब्या.........

भगत्याने हळुच बोटांना चिकटलेला थोडा अंगारा स्वतःच्या कपाळाला लावला व मला इशारा केला मी अवसान आणुन म्हणालो, "बरं तर मग यशवंत मालक आम्ही येऊ का आता???"

"जा फ़ुटा चालते व्हा, उद्या उठाल तेव्हा तुम्ही आजची रात्र विसरला असाल..... पळा..... डॉक्टर्स म्हणे हाहाहाहा"

"बरं मालक, एकदा आमच्या दोस्ताची गळाभेट घेऊ द्या ना कृपा करुन गरीबां वर.... उपकार होतील राजे"

परत तोच चेहेरा, भेसुर, तारवटलेले डोळे तेच खुनशी हास्य,

"ठीक आहे "म्हणत जवळ येत असलेलं........ माझ्या अगदी जवळ......... अंब्याच्या अंगातला यशवंत जवळ आला पहीले भगत्याच्या गळ्यात पडला अन अंब्या क्षिण आवाजात बोलला

 "भगत वाचव यार"....

तोच परत एकदम चेहे~यावरचे भाव बदलुन ओरडला "ए गप".....

जसा यशवंत/अंब्या माझ्या जवळ आला मी पहीले त्याला घट्ट मिठी मारली इतकी की ते भुत पण बावचळले, "अरे अरे काय करतो सोड मला" ते ओरडले....

 पण चेहे~यावर तेच खुनशी हास्य विलसत होते त्याच्या....

 मी दात ओठ खाऊन ओरडलो" "हरामी माझ्या मित्राला नडतो काय"

काही कळायच्या आत माझे हनुमानाचे कडे मी त्याच्या उजव्या हाती चढवले होते...... पुर्ण हवा भरलेला फ़ुगा जर बुडाकडुन मोकळा सोडला तर जसा हवेत सैरावैरा धावतो तसा अंब~या चे शरीर हवेत उडत होते, तो भयानक खिंकाळ्या मारत होता, शेवटी अंब्याच्या तोंडुन एक अगम्य आवाज निघाला व अंगातुन एक प्रकाश निघुन आमच्या समोर कापरासारखा भसाभस जळाला....... अन आश्चर्य म्हणजे अंब्याला पुर्ण गढीत उड्या मारताना खुंट्यांवर लटकताना धावताना झालेल्या जखमा अन फ़ाटलेले अन मातीत मळलेले कपडे पुर्ववत झाले होते.......

झोपेतुन उठल्यासारखा तो उठुन बसला व म्हणाला

 "इतका कडक नका भरत जाऊ रे चिलमीत, मी तर पार बेशुद्ध झालो गंजेड्यांनो"

तुम्ही सगळा संपवला असेल न फ़कॉल पब्लिक स्टफ़.... भगत्याने व मी एकमेकांकडे पाहिले व ढसाढस रडायला लागलो...... अंब्याला जास्त काहीही न बोलता आम्ही सरळ गाडी काढली साईवर्षाला गेलो, २ बियर लावल्या अन शांत झोपलो,

                                  दुस~या दिवशी उठले तर भगत अन अंब्याला काहीच आठवत नव्हते त्यांना फ़क्त गाडी गढी बाहेर लावलेली आठवत होती व मनसोक्त चिलिमीमारुन साईवर्षावर प्यायलेली आठवत होती.... अन मला काही विसरता येत नव्हते...... कारण माझा असलेला मनुष्यगण माझी ती आठवण मिटू देत नव्हता अन अंब्या भगत्यांच्या पत्रिकेत असणारे राक्षस व देवगण त्या आठवणी पुसुन बसले होते...........

आजही कधी कधी जेव्हा अंब्या एखादी खोडी काढतो तेव्हा मी फ़ारच अस्वस्थ होतो.......

कारण अंब्याला ही कळत नाही अन भगत ला पण कळत नाही.....


 पण ते मला कळते...... कारण आजही अंब्याने एखादी खोडी काढली की तो त्या रात्रीसारखाच हसतो....... डोळे तारवटत...... ओठांची टोके डोळ्यांकडे वळवत........

Wednesday, 29 June 2011

दगडाचे सुप , अजुन एक लघुकथा !



उरल डोंगररांगा रशिया देशाच्या पश्चिमेला आहेत व पार उत्तर दक्षिण पसरलेल्या आहेत, ह्या पर्वतराजीतल्या उत्तरेकडच्या टोकाला  भयानक थंडी असते, तिकडच्याच एका गावात घडलेली ही गोष्ट. नादिया नावाची एक म्हातारी स्त्री गावाबाहेर आपल्या रानातल्या प्लम व चेरींच्या टुमदार बगिच्यात लहानशी बंगली बांधुन राहात असे, दुर्दैवाने तिचा मुलगा तुर्कांसोबतच्या युद्धात दुर दक्षिणेला कॉकेशस पर्वतांमधे झालेल्या एका युद्धात झार मालकांसाठी मरण पावला होता, व तिचा नवरा एकदा उरल मधेच तावदा नदीत मासे पकडायला गेला असताना मरण पावला होता "ग्रेगोरी गेला" हे ऐकुनच तिला धक्का बसला होता. अशी ही म्हातारी नादिया म्हातारवयामुळे व आलेले संकटाचे डोंगर झेलुन थकल्यामुळे आजकाल तिरसट व चिडचिडी झाली होती परवाच तिने व्होल्गा पारिचेव्होबा चा मुलगा इवान ह्याला घोड्याच्या वादीने फ़ोडले होते कारण त्याने नादियाच्या बागेतील एक चेरी चा घोस तोडुन खाल्ला होता. सबंध गाव तिला घाबरुनच असे. मुलगा व नवरा दक्षिणेला गेले व देवाने हिरावुन घेतले म्हणुन ती दक्षिणेतुन आलेल्या कोणाचा ही रागराग करित असे. वरतुन ती गावाच्या उत्तर टोकाला राहात असे म्हणुन ती दक्षिणेला वसलेल्या गावचा व गावक~यांचा पण राग करीत असे.
                                                                                                                                              अशीच एकदा नादिया रात्री झोप येत नाही म्हणुन बायबल वाचत बसली होती. तोच तिच्या दारावर टकटक झाली, म्हातारी नादिया तिरीमिरीत उठली व दार वाजवुन घाबरवणा~या पोराला बोल लावायचे म्हणुन दार उघडले तो काय नवल, तिला एक तरुण शिपाई दिसला, बर्फ़-पाण्यात भिजलेला तो जीव करुण झाला होता, पण नादियाच्या खाष्ट स्वभावाला तोड नव्हती.
"काय आहे?? इतक्या रात्री काय खुशाल दारे बडवताय"
"माय, मी दुर सैबेरीयातुन आलोय ग, तिकडे छावणी होती माझी, मी माझा घोडा हरवला म्हणुन आमच्या कर्नल ने मलाच तो शोधुन द्यायचा आदेश दिला . तो दिला व आता मी सुट्टीवर घरी जातो आहे, मी मुरमान्स्क चा आहे, फ़िनलंड देशाच्या सरहद्दीवर आहे माझा गाव."
"हे बघा माझ्या कडे तुम्हाला काही मिळणार नाही सांगुनठेवते. नसती नाट्के करु नका व्हा चालते"
तसे त्या शिपायाची मुद्रा अजुनच काळवंडली. गयावया करीत तो म्हणाला
"नका नका माय असे म्हणु नका तुमच्या गावच्या शिवेवरच माझा पाय मोडलाय हो, दया करा, पुर्ण गावात फ़क्त तुमच्या टेकडीवरच्या घरातच दिवा दिसला म्हणुन आलोय मी"
"नाही त्रिवार नाही, मर तुझ्या कर्माने जा चालता हो" असे म्हणत नादिया दार धडकणार इतक्यात तो बोलला
"माय, ऐकुन तरी घे ग, बघ माझ्या पिशवीत सगळे आहे, मला फ़क्त तुझी ओसरी दे व एक जग भरुन पाणी दे, मी माझे दगडाचे सुप करुन पितो अन झोपतो तुझ्याच पडवीत, सकाळी उठुन जाईन माझ्या वाटेने", तेव्ढ्यात दुर डोंगरात एक लांडग्याची बांग ऐकुन म्हातारी पण थोडी द्रवली. खरे तर तिचे कुतुहल चाळवले गेले होते
ती लगबगीने एक जगभरुन पाणी घेऊन आली, येताना पुटपुटतच आली "काय पण म्हणे थेरं, अन दगडाचे सुप म्हणे"
"काय रे दगडाचे कधी होते का सुप??"
"हो माय, हा खास दगड आहे, मी एकदा युद्धात जखमी झालो होतो तेव्हा मी सेंट पिटर ची मनापासुन करुणा भाकली होती तेव्हा मला शांत झोप पण लागली अन दुसरे म्हणजे उठलो तेव्हा माझ्या उजव्या मुठीत हा दिव्य दगड होता."
"बघु बघुच तुझे हे दिव्य दगडाचे सुप म्हणुन म्हातारी नादिया दाराच्या उंब~यावर ठाण मांडून बसली"
गडी कामाला लागला, पहिले त्याने जवळच्या काही काड्या गोळा केल्या त्यांची आगोटी तयार करुन त्यावर सैनिक शिधा शिजवत ते भांडे ठेवले. त्यात खुप जपुन कोटाच्या आतल्या खिश्यात ठेवलेला एक वाटोळा गोटा ठेवला व म्हातारीने दिलेले पाणी त्यात ओतले.
"माय, हे सुप ढवळायला तुझ्याकडे पळी असेल काय ग?"
"काय कटकट आहे, माझ्याकडे नाहीये काही पळीबिळी" असे म्हणत म्हातारी उठली व शेवटी पळी घेऊनच आली "हे घे शिपुर्ड्या, अजुन काही मिळायचे नाही सांगुन ठेवते"
बराचवेळ गडी पाणी ढवळत बसला. मग हळुच स्वगत बोलल्यागत बोलला "सफ़रचं...... चक्चक चक"
चौकस झालेली म्हातारी म्हणाली "काय रे काय म्हणालास तु?"
"काही नाही माय, ह्या सुपात जर सफ़रचंदाच्या फ़ोडी घातल्या तर असली लज्जत येते, पण जाऊ दे तुझ्याकडे कुठली ह्यावेळी सफ़रचंद असणार ग" असे म्हणुन तो पाणी ढवळत बसला...
"नाही का म्हणुन आहेत माझ्या कडे सफ़रचंदे थांब आणते," म्हणत म्हातारी घरात पळाली व तीन सफ़रचंदांच्या चांगल्या फ़ोडी करुन घेऊन आली "पुरेत काय रे?
"बख्खळ झाली माय बस कसे आहे सफ़रचंदांनी गोडमिट्ट होते ग दगडाचे सुप, म्हणुन मी किनई त्यात दोन चार बटाटे घालत असतो, पण नसतील तुझ्याकडे बटाटे..... असो"
शिपाईगड्याचे बोलणे ऐकुन ते संपायच्या आतच म्हातारी बटाटे चिरायच्या उद्योगाला लागली होती, दोन बटाटे पुरेत ग माय त्याने स्वयंपाकखोलीत असणा~य़ा नादियाला ओरडुन सांगितले.
बटाटे टाकुन पण तो काही काळ ते सुप ढवळत बसला, थोड्या वेळाने हसुच लागला तसे म्हातारी नादिया चिडुन म्हणाली
"हसायला काय झालंय तरी काय मेल्या???"
"काही नाही ग माय, ह्या सुपात किनई बोकडाचे खारवलेले मांस फ़ार मस्त लागते व लज्जत वाढवते, सैबेरीयाच्या छावणीत तर बोकड नसला तर आम्ही ह्यात रेंडीयर टाकत असु...ते आठवले अन हसलो बघ"
"देऊ का तुला खारवलेलं बोकडाचं मांस?" "
"नको नको माय कश्याला उग्गीच तुला त्रास" असे म्हणुन तो सुप ढवळत बसला........
"त्यात कसला आला आहे त्रास म्हणत नादिया उठली व चांगली खारवलेली कलेजीच घेऊन आली"
मटण टाकुन तो तसाच ढवळत बसला, थोड्या वेळाने घाबरा झाला तसे नादिया म्हणाली "काय रे असा का घाबरा झाला तु?"
"मी जातो माय....."
"ते काही नाही आधी कारण सांग, ते सुप पुर्ण कर अन मग मर कब्रस्तानात जाऊन"
"अगं, मला सेंट पिटर चा आदेश आहे ग, ह्या दैवी सुपात जर मी कांदा नाही घातला तर मला नरकवास होईलच पण मला लांडगे फ़ाडुन खातील अन मगच मी मरेन. आता तुला कांदे मागणे काही मला रुचत नाही, त्यापेक्षा मी पळतोच कसा!!!!!"
"थांब मेल्या , बीनकांद्याचा मेलास तर माझ्या डोक्याला मढ्याचा ताप होईल तुझ्या" असे म्हणत नादिया २ कांदे चिरुन घेऊन आली
"माय तु जीव वाचवलास बघ माझा!!!!!!"
"झाले का रे बाबा तुझे दिव्य सुप???"
"थोडा धीर धर माय"........
थोड्यावेळाने तो एकदम उठला व जोरजोरात नकारार्थी मान हलवत जायला लागला
"ए बाबा काय झाले?"
"अग माय हे सुप करायच्या आधी त्यात २ चमचे लोणी, चिमुटभर मीठ व काळी मिरी नाही घातली तर पुर्ण सुप खराब होते. व ते देवाचे नाही सैतानाचे सुप होते, असो आजचा दिवसच खराब आहे, येतो मी"
तो जोडे घालेस्तोवर म्हातारी विचारमग्न झाली व हळुच म्हणाली "मागुन मीठ-मिरी-लोणी" घातले तर नाही का चालत रे?"
"अग पण ते आहे का तुझ्याकडे? नाही उगाच तुला कश्याला त्रास"
"नाही नाही त्रास कसला.... देवाचे काम सैतानाचे व्हायला नको, मला पण थोडे पुण्य लागु देत की"
मीठ मिरी लोणी आले, तसे सुपचा रंग मस्त खुलुन आला.... व ते उकळु लागले.
"आता झाले का रे ते सुप??"
"हो "आई" ते सुप झाले आहे"
"आई" अरे देवा अंधारात अधु डोळ्यांना दिसले नाही खरे आहे पण मी आवाजही कसा विसरले..... अरे तु तु तु माझा मिखाईल... अरे तु जिवंत..... मिखाईल!!!!!"
म्हातारी ढसाढस रडु लागली तसे पोरगा म्हणाला. "आई, मी वारल्याची अवाई उठली ..... काही दिवसांनी बाबा पण गेले..... पण तुला देवाने चांगले आरोग्य दिले होते ना? म तु अशी का झालीस???, हे बघ आई देवाने आपल्याला सगळे दिले असते आपणच ते शोधु शकत नाही, घरात सफ़रचंदापासुन ते लोण्यापर्यंत सगळे आहे पण जर ते काढण्याची वृत्तीच आपल्याकडे नसेल तर कसे होणार माऊले????"
"आज मी गावात आलो ते कुठे न जाता घरी यायला निघालो तसे व्होल्गा परिचेव्होबा भेटली, ती म्हणाली तु खुप खाष्ट झाली आहे व नवरा-मुलगा गेल्या पासुन तु दैवाला दोष देत जे चांगले आहे ते न पाहता देखील सारखी चिडत असतेस, म्हणुन तुला समजवायसाठी हे सुप पुराण केले बघ".... म्हातारी आता शांत पणे घळा घळा डोळ्यातन आसवे गाळत होती
ती हळुच उठली येशुच्या तसबीरीपुढे उभी राहीली व कन्फ़ेशन देऊ लागली... तसे मिखाईल सुप घेऊन आत आला थोड्या वेळाने दोघ मायलेकरु गरम ऊन सुप पिउन झोपी गेले.
सकाळी नादिया उठली कधी नव्हे ते तिने आरश्यात स्वतःलाच हसताना पाहिले व स्वतःच हरखली, ती टोपले घेऊन बागेत गेली भरघोस लहडलेल्या चेरीं मधुन तिने टोपलीभर चेरी तोडल्या व व्होल्गा मावशीच्या दारात उभी राहुन हाळी दिली
"व्होल्गाsssssss कुठेस गं????"
आता भांडायचे असा विचार करुनच ती पण बाहेर आली, तो काय!!! आक्रित व्हावे तसे नादियाने वाकुन तिच्या हाताचा मुका घेतला व म्हणाली "माफ़ी मागायला आले मी"
"जाऊ द्या ना काकी काय तुम्ही पण ,मी लहान आहे माझी कसली माफ़ी मागताय" असे व्होल्गाही म्हणाली..
असे म्हणुन टोपली भर चेरी इवान ला देऊन म्हातारी प्रसन्न मुद्रेने घरी आली
नादियाच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती, तिने जवळच्याच खेड्यातल्या एका सुंदर मुलीशी मिखाईल चे लग्न लावुन दिले व पुढे मुला-सुना-नातवंडात राहुन उरलेले आयुष्य मजेत घालवु लागली

ही कथा मी फ़ार म्हणजे फ़ार लहान असताना ऐकली होती, जशीच्या तशी नाही पण जशी आठवेल तशी गाभा तोच ठेवत पुनर्रचना करायचा हा माझा प्रयत्न आहे, मुळ कथेतली गावे व्यक्तिरेखा वेगळ्या आहेत, पण त्यातला रशियन लोककथेचा टच तसाच ठेवण्यासाठी मी माझ्या कल्पनेतली नावे व जागा घातल्या आहेत, नेहमीप्रमाणेच कथा काल्पनिक नाही पण पुर्नरचना करताना काल्पनिक झाली आहे थोडी, रशियन लोककथेवर आधारीत!!!!!!!!!!

Thursday, 23 June 2011

काही अतिशय जुनी पुस्तके, विचारधन.

हे जे पुस्तक आहे ते म्हणजे "सेनापतींच्या समाधीवर" द.मो.भावे हे पां.म.बापट उर्फ़ सेनापती बापट ह्यांचे शिष्य अथवा सहकारी समजा, त्यांनी लिहिलेले आहे, ग.त्र्यं.मडखोलकरांची प्रस्तावना असणारे हे पुस्तक सेनापतींचे स्वभाव विशेष व कार्यस्मृतींवर आधारीत आहे, १९७५ साली बहुदा आमच्या आबांनी ( स्वतः एक  सशस्त्र कांतिकारी) मात्र २० रुपयांत आणलेलं आहे. हे सिताबर्डी नागपूर येथे राहत असत.
हे आहे मुक्तयोगी, सेनापतींचेच चरित्र आहे लेखक आहेत सुधाकर बापट, १९७८ साली प्रकाशित व ४० रुपये मुल्य असणारे हे पुस्तक म्हणजे सेनापतींचे कादंबरी स्वरुप चरित्र आहे, मात्र जवळपास सत्यकथनच आहे. अतिशय उत्तम लेखनशैली व सुलभ भाषा आहे.
स्मृतिंच्या मशाली, हे पुस्तक खरेच खुप खुप दुर्मिळ आहे, कारण हे मुळात जास्त प्रकाशझोतात पण आलेलं नाही. विदर्भाचा वर्हाड हा इलाखा म्हणजे पाच जिल्हे आहेत, ह्या जिल्ह्यांमधे झालेल्या स्वातंत्र्य चळवळी, व विशेषतः अकोला जिल्ह्यातील घडामोडी व्यक्ति ह्यांचा धांडोळा आहे. हे कोणाला माहित असण्याचा पण संभव नाही. मिठाचा सत्याग्रह झाला तेव्हा प्रतिक म्हणुन बादलीत मिठाचे पाणी तयार करुन ते सुकवुन सत्याग्रह केल्याची मजेशीर आठवण ह्या पुस्तकात वाचल्याचे स्मरते. माझ्या कडे हे असण्याचा संदर्भ म्हणजे मुळचे सातारा जिल्ह्यातले आमचे घराणे विदर्भात कसे आले घरचे राष्ट्रीय वातावरण, माझ्या आबांची जडणघड्ण, हा इतिहास ह्या पुस्तकात आहे.

हे आहे १९५८ मधे छापलेलं "यांत्रिकाची यात्रा" म्हणजेच "लक्ष्मणराव किर्लोस्कर" ह्यांचे चरित्र...... मुल्य मात्र पाच रुपये, अतिशय जीर्ण झालेलं हे पुस्तक. पण छपाईचा दर्जा व लेखन ह्या बाबतीत फ़ारच छान आहे. खाली ह्या पुस्तकातीलच काही छायाचित्रे देतो आहे, छपाईच्या दर्जाची कल्पना यावी.
आदरणीय श्री.लक्ष्मणराव किर्लोस्कर

हा फ़ोटो घेताना कॅमेरा हलला आहे, फ़ोटोत लक्ष्मणराव व श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी संस्थान औंध

हे लक्ष्मणराव... राधाबाई ह्यांचे दुर्मिळ छायाचित्र, मांडीवरचे लहान बाळ म्हणजे वय वर्षे एक असणारे शंतनुराव आहेत

लोखंडी नांगराची जाहिरात आहे ही

पुण्यातील औद्योगिक प्रदर्शनात मांडलेली ही किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, ही कंपनी आजही "कोईल" म्हणुन अस्तित्वात आहे पुण्यात खडकी येथे

हे पुस्तक जुने जरी नाही तरी दुर्मिळ आहे खचितच. अवेक्निंग इंडीयन्स टू इंडीय़ा नावाचे हे पुस्तक, विकत मिळत नसे, विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या एका प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी हे मुद्दाम छापलेले होते चिन्मय मिशन ह्या स्वामी चिन्मयानंद प्रणीत संस्थेने. "इंपोर्टेड ते उत्तम" ह्या मानसिकते मधुन भारतीय तरुण बाहेर काढण्याचा हा एक प्रयत्न , प्राचिन ते आधुनिक भारताने जगाला दिलेल्या साहित्यिक वैज्ञानिक व इतर देणग्या ह्यात मस्त रोचक स्वरुपात मांडलेल्या आहेत.
मानवेंद्रनाथ रॉय व्यक्ती अन विचार, हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करणारे मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी व विचारांविषयी विवेचन करणारे पुस्तक आहे, सद्ध्याच्या कम्युनिस्टांनी राष्ट्रवाद व कम्युनिझम ह्यांची सांगड कशी घालावी ह्या साठी पारायणे करावीत असे हे पुस्तक आहे....असो
हरिदिनी, सावरकर ह्या देशभक्त घराण्यातल्या एक अतिशय कमी माहिती असणा~या पण महत्वाच्या व्यक्तिमत्वाचे चरित्र ते म्हणजे, शांताबाई नारायणराव सावरकर ह्यांचे चरित्र.

समग्र सावरकर साहित्य, १८५७ प्रथम स्वातंत्र्य युद्ध, इंग्रजीत आहे. १९६३ पंधरा ऑगस्ट चे प्रकाशन आहे किंमत मात्र रुपये पंधरा. सगळेच्या सगळे खंड आहेत आमच्याकडे समग्र सावरकर.

अशी माणसे येती, सेतु माधवराव पगडी. इतिहास हा पाचवा वेद असतो व समस्त चार वेद जर नीट कळायचे असतील तर हा पाचवा वेद नीट पचवताच आला पाहिजे, ही आमच्या घराण्याची शिकवण आहे पिढ्यांपिढ्या पासुन चालत आलेली कामधंदा कुठला ही करा, इतिहासाचा व्यासंग केलाच पाहीजे असे आमचे पणजोबा नेहमी म्हणत. माझ्या अल्पमती प्रमाणे मी तो करण्याचा प्रयत्न करत असतो. हे पुस्तक म्हणजे भारतीय इतिहासावरचे मी वाचलेलं सर्वाधिक तठस्थ पण उत्तम विवेचन असणारे आहे, लेखन पण सेतु माधवरावांसारख्या भिष्माचार्यांचे असणे म्हणजे दुर्मिळ योग!!!!!!!! इमादशाही ते ब्रिटीश साम्राज्य व मुघलाई ते मराठेशाही सगळे वेगळ्यावेगळ्या प्रसंगातुन मांड्ले आहेत

हा आहे स्वामी विवेकानंदांचा अतिशय जुना फ़ोटो कधीचा आहे देव जाणे. घरी आहे आबांनी आणलेला आहे, "मै उस प्रभु का सेवक हुं जिसे अग्यानी लोग मनुष्य कहते है" हे स्वामीजींचे तत्व आपले तुफ़ान आवडते तत्व आहे

आज माझी वैयक्तिक लायब्ररी थोडी साफ़सुफ़ करताना हा जुना ठेवा सापडला खरेच मनापासुन शेयर करावासा वाटला!!!!!!!!

Saturday, 18 June 2011

ते २४ तास


पेशावर
मस्जिदीच्या बाहेर तो असाच दाढी खाजवत उभा होता. थोड्यावेळाने दुपारच्या नमाजची अजान झाली तसे तो उठला लगबगीने पाण्याच्या नळावर गेला आधीच घोट्यापर्यंत असलेली विजार वर ओढली व अल्लाहच्या पवित्र वातावरणात तो तल्लीन झाला व वझु केली, कोणीही नाव विचारले तर तोंडुन फ़क्त "यॅंव "यॅव" करायचा, हातात उर्दुत लिहिलेली चिठ्ठी......
"खुदावंत ,महाराजसाहेब हा आमचा मुरीद असुन लकव्याने बिचा~याचे वाचातंत्र अल्लाहला प्यारे झाले आहे, अमेरीकन बॉंबच्या आवाजाने ह्यांचे कान गेले आहेत, बदला आम्ही इन्शाल्लाह घेऊच , तुर्तास जर तुम्ही कलम्यात ह्या गरीबास रोटी तुकडा घातल्यास तुम्हाला झकात कलम्याचे पुण्य लागेल"......
मुका बहिरा असलेला हा सालस गोरा पठाण पाहुन पुढे पुढे लोकही हळहळु लागले जेव्हा आतल्याखोलीच्या बाहेर न पडणा~या मौलवींच्या कानावर ह्याची व्यथा गेली तेव्हा ह्यांनी त्याची नेमणुक त्यांची सरबराई करणारा म्हणुन केली होती, पेशावरच्या ह्या मशिदीत आतल्या खोलीत जे पाहुणे येतील त्यांची सोय करणे ह्याचे काम असे, त्याचे एकंदरीत बरे चालले होते.
मुंबई
इथले एकप्रसिद्ध रुग्णालय, होय, इथेच पंतप्रधान वगैरे ऑपरेशन्स करवुन घेत, तिथे एका चेंबरवर "डॉ.गणेश पाटील" अशी पाटी, पुर्ण हॉस्पिटलात ह्या नावाचा दरारा होता हे कधीच ओ.टीला नसत पण "डायग्नॉस्टीशियन" म्हणुन ह्यांचे जबरदस्त नाव होते, जरा विक्षिप्तच म्हणुन असलेले हे महाशय अतिशय निष्णात होते, रोगाचे अचुक निदान करणे व संबधित तज्ञाकडे ती फ़ाईल वळती करणे हे ह्यांचे काम!!!!!.अनाथ म्हणुन वाढले म्हणुन विक्षिप्त आहेत हे असे लोक सांगत, ह्यांच्या दिमतीला फ़क्त प्रकाश काणे नावाचा एकच वॉर्डबॉय होता, फ़ायली ने आण करणे व फ़ावल्यावेळी त्यांच्या शिव्या व क्वचित प्रसंगी मार खाणे इतकेच त्याचे काम होते. मधे मधे त्यांना पक्याची दया आली की ते त्यास मस्त बियर प्यायला म्हणुन नेत, त्याच्या सुरस कथा पुर्ण हॉस्पिटल नंतर महिना दोन महिने ऐकत असे.
दिल्ली,
सत्ता व ताकद ह्यांचे वेड असणार लोकांची गोड मनीची कळ!!!!!.... ज्याच्या गाडीचा बेकन लॅंप जितका मोठा त्याचा "रुतबा" तितका जास्त. चाणक्यपुरीतला एक भारी फ़्लॅट, पाकीस्तानी वकिलातीच्या बाहेरचे गेट इथुन दिसत असे, दोन पठाण संत्री इथे कायम असत.
तिथे राहणा~याचे नाव बाहेर लिहिलेलं "मोहनिश मंडल" "एम.ए पीएच डी" हे महाशय "नॅशनल आर्काईव्ह्ज" चे क्युरेटर होते. "प्राचीन पांडूलिपियां हमारा दिमाग जगा देती है" असे म्हणत प्रेसक्लब रेस्टो ला सॅंडवीच खाणारी ह्यांची मुर्ती लोकांच्या मस्त परीचयाची होती, इतकी की ते गेल्या गेल्या ५ मिनिटात ग्रील चिज टोस्ट त्यांच्या टेबलावर असे, असा हा जवान खरेच जवान म्हणजे अगदी ३०-३१ चा असेल.
सगळ्यांच्या पेक्षा वेगळे "ते" ऑफ़िस होते, बाहेर एकच पाटी.......... "शिवराम देशकर" सेक्रेटरी , विभागाचे नाव माहित नसल्यामुळे हे साहेब "सामान्य प्रशासन" चेच असावेत व आपले "सी.आर" ह्यांच्या हाती असणार म्हणुन पब्लिक ह्या पाटीला टरकुन असे, ह्यांचा संबंध कधी पी.एम सरांनी सॅलॅरी चेक्स मागवले किंवा बोलावले तरच येई, ह्यांना बलविंदर नावाचा एक दणकट ड्रायव्हर होता व मनस्वी बोस नावाची एक टपो~या डोळ्याची बंगाली पी.ए होती.
ग्रीन्वीच मीन टाईम नुसार टाईमझोन +५.३० तास, चेन्नई,मुंबई,कोलकाता, दिल्ली ह्या झोन मधे रात्रीचे बारा वाजले होते, थोडक्यात भारत पाक पुरते झोपेत होते, सीमेवरचे फ़ाकडे मुस्तैद होते.
अदल्यारात्रीच पेशावरच्या मस्जिदीतला मुका सेवक, जलालाबादला जाऊन कच्च्या बच्च्यांना भेटुन येतो म्हणुन परवानगी घेऊन निघाला होता, मौलवींनी त्याला वाटखर्चाला म्हणुन १०० रुपये दिले होते, तो कितीतरी वेळ त्या पाकी नोट ला हरखुन पाहत होता, जिनांचा फ़ोटो कौतुकाने न्याहाळत होता.
साकीसाहेबाचे चेकपोस्ट जवळ येताच खाकी कपड्यातला पाक रेंजर पुढे आला,
"पासपोर्ट दिखाईएगा जनाबात, खवातीनात के वास्ते अलग से जनानी अफ़सरान है अंदर",
सगळे प्रवासी सावरुन बसले शेजा~यानेच मुरीदचा पासपोर्ट चेक करवला व
"साहेब हा मुका व बहीरा आहे ह्याला जलालाबाद ला जायचंय बायकामुलांना भेटणेस, तशी चिठ्ठी पण आहे त्याच्या खिशात पेशावरच्या बड्या इमाम साहेबांची"
असे सांगत कर्मकहाणी साहेबांस वदली होती, पेशावरचे बडे इमाम म्हणजे आपले जनरल साहेब नेहमी मुजाहीदिनांचे शिरोमणी म्हणतात तेच हे त्या रेंजर ने ताडले व त्याने स्वतःच त्याला पासपोर्ट शिक्का मारुन आणुन दिला होता....
नाव मुरिद शाहिद
राष्ट्रीयत्व अफ़गाण
पासपोर्ट क्रमांक **********
पत्ता :- शिकोहागंज,
उत्तर तट,
काबुल नदीच्या तिस-या वळणाला,
काबुल
अफ़गाणिस्तान.
जलालाबाद फ़ाट्यावरुन बस पुढे निघाली तेव्हा मुरिद लघवीला म्हणुन उतरला ते कलटी मारुन कंदाहार च्या वाटेला लागला होता, दिड तासात अंदाजे रात्री १.२५ ला तो कंदहारच्या भारतीय वकिलातीबाहेर दाढी खाजवत होता.
सी.आय.एस.एफ़ चा जवान रतन मिश्रा वकिलातीच्या मेनगेट ला बंकर ड्युटीवर होता , खरेतर त्याची अफ़गाणिस्तानात यायची अजिबात इच्छा नव्हती घरी बायको ६ महिन्यांची अवघडलेली, बाबाजी आजारी पण आपली प्यारी फ़ोर्स CISF चे नाव जपायचे,ट्रेनिंगला जगायचे ,प्रोफ़ेशनली जगायचे असे म्हणत हा २५ वर्षांचा तरणाबांड जवान स्पेशल फोर्सेस चे प्रशिक्षण घेऊन इकडे आलेला.मागील वर्षी वकिलातीवर झालेला कार बॉंबिंग चा हल्ला आठवत रतन जास्तच कडक झाला होता,सतर्क झाला होता, झोपताना पण उशाला एक लोडेड झिट्टारा रायफ़ल नेहमी असायची त्याच्या, एकही अफ़गाण जर बाहेर पाच मिनिटे जास्त रेंगाळला तरी हा लोडेड झिट्टारा सरळ त्याच्यावर रोखायचा.
मुरीद तिथे उभा दिसताच रतन रोखुन पाहु लागला. गोळी घालायची म्हणुन त्याने स्टेशन इन्चार्ज कमांडंट अल्लारी वेंकय्या उर्फ़ एके ह्यांची परवानगी घ्यायची म्हणुन , त्याने वॉकी वर संदेश टाकला, "Tiger calling Den..... seeking clearence for hostile situation over"
अल्लारी उर्फ़ एके घड्याळ बघत घाई घाईत बोलला "Tiger this is Den, permission denied....., hold your magzine.... alpha is entering field..provide secondary backup"
रतन येडा झाला, एक अफ़गाण ठोकायचा म्हणुन कं. ए.के स्वतः कशाला येतोय, काय वेगळे आहे ह्या गबाळ्या अफ़गाणात ???? मरु दे "भैय्या यह तो हाय लेव्हल अफ़सरों के फ़ंडे है " असे स्वतःशीच म्हणत त्याने ड्युटीमेट्स अतिब मतीन व शंकर नायर ला उठवले.
"अन्ना आ रहा है, होस्टाईल अफ़गान है, मल्लु तु एल.एम.जी संभाल, भाईजान ग्रेनेड्स तयार , मै खुद स्नायपर पर हुं"
"Den we are all set, I repeat all set... Alpha is clear to hunt.... I repeat alpha is clear to hunt"
एके आला, त्याने मुरिद कडे हसुन पाहिले आणि अहो आश्चर्यम मुरिद त्याच्याकडे पाहुन आधी हसला मग रोखुन बघत चक्क सावकाश आवाजात बोलला!!!!! "सौ रब दी....." एके ढीला झाला,
त्याने त्याच्या खिशात असलेल्या मॅग्नम .४५ पिस्तुलावरची पकड थोडी सैल केली व म्हणाला "सर्फ़रोष",
लगोलग तो वॉकी वर बोलला "alpha to pit, clear penetration ,surveivellence called off" ...
अन आता रतन मिश्रा खरेच वेडा व्हायला आला एके ह्या अफ़गाणाच्या खांद्यावर मजेत हात टाकुन चक्क मराठी बोलत वकिलातीचे सिक्युरिटी कॅम बंद करवुन त्याला आत नेत होता.
अफ़गाण आत पोचताच, राजदुत दिपेश पटेल सामोरे आले ह्या आतल्या खोलीला सुभाषबाबूजी काबुल-कंदहार ला आल्याच्या आठवणीत "सुभाष एन्क्लेव्ह" असे नाव दिले होते सरकारने. सर्वत्र पर्शियन नेव्ही ब्लु रंगाचे व्हेल्व्हेट (जी.ओ.आय चा ऑफ़िशियल रंग) लावलेले होते बाहेरच्या २ डिग्री तापमाना पेक्षा आत मस्त उबदार होते.
एका टोकाला राजदुतांचा मोठा शिसवी टेबल व डिप्लोमॅट्स चेअर, वजन होते त्या खुर्चीला........... १२१ कोटी भारतीयांचे अफ़गाणिस्तानातले रिप्रेसेंटेटीव्ह अशी जगाला त्या खुर्चीची ओळख होती म्हणुनच त्याचे वजन अजुन जाणवावे म्हणुन की काय मागे एक्मेकांकडे बघणारे दोन तिरंगे व त्यांच्या वर भारदस्त असे बर्मा टीक मधे कोरलेले अशोक चिन्ह.
अफ़गाण जरा लक्षच देऊन ते न्याहाळत होता तोच पटेल सर बोलले "सो कॅप्टन समीर चितळे हाऊ आर यु??"
"आय ऍम फ़ाईन सर" अफगाण(मुरिद) उर्फ समीर
"नक्की का रे समीर??? जरा स्ट्रेस्ड वाटतोयस??"
"थोडा आहे सर, तीन महिने आधी पोरगी झाली मला, अजुन बघितलेली नाही,बायकोला वाटतंय मी माझ्या रेगुलर बटालियन सोबत कुठेतरी पंजाबात आहे अन मला सुट्टी मिळत नाहीए, मॅरीड क्वार्टर्स मिळत नाही म्हणुन तिला कसे बसे थोपवले आहे नाही तर ती आता सोबत रहायला येते म्हणत होती,एवढा ससा हाती लागलाय पण तो काही बोलत नाही अन मी रोज मशिदीचे रांजण भरतोय!!!!!!!"
तिघेही हसले, "युवर चॉईस ऑफ़िसर????"....
सम्याने निर्विकारपणे बाटल्या पाहील्या व म्हणाला "स्कॉच व्हाईट एंड मॅके रॉक्स प्लिज सर"
"एके तुमचा रेग्युलरच का???"
"येस सर दॅट वुड बी काईंड ऑफ़ यु" इति एके
पटेल बाबूंनी त्यांच्या हातातले वायरलेस बेल चे बटन दाबले तसा पी.जी वोडहाऊस चा जीव्स वाटावा तसा श्रीधर पांडे ऑर्डरली आला
"एनीथिंग निडेड मिस्टर एंबेसेडर सर???"
"काय खाणार कॅप्टन???"
"सर ब्रेड ऑम्लेट विल डू", पांडेजी लगेच तत्पर
"स्पॅनीश ऑर फ़्रेंच इफ़ यु हॅव टू बी स्पेसिफ़िक सर???"
"स्पॅनिश विल डू पांडे जी थॅंक्स"
"एनीथिंग मोर सर??"
"नो पांडेजी धन्यवाद आपका और हां पांडेजी अगले हफ़्ते आनेवाले एयरफ़ोर्स डेलिगेशन से बात करके मैने आपके जाने का बंदोबस्त कर दिया है, रिप्लेस्मेंट भी उसी फ़्लाईट से आने वाला है, तब आप घर जा सकेंगे मैने छुट्टी सॅंक्शन करवा दी है" पटेल बाबूंनी समारोप केला
"बोहोत मेहेरबानीयां " असे मोजकेच बोलत पांडेजी अंतर्धान पावले
"पांडेजी रिटायर होतील नाही आता सर??? " समीर ने विचारले,
"हो रे, तेच त दुखः आहे मित्रा. ट्रेंड माणुस होता वरतुन एक्स आयबी टोटल भरोश्याचा खरेतर आम्ही डीप्लोमॅटीक पार्टी थ्रो करतो ते फ़क्त सगळ्यांनी आपल्या वकिलातीत यावे म्हणुन ते इकडे आले की सर्व्हेवलंस इन्फ़ॉर्मेशन कलेक्शन ची कामे हे ऑर्डर्लीज फ़ार सफ़ाईने करतात बघ हातात ग्लासेस चेहरा निर्विकार पण तल्लख डोके" नकळत समीर च्या मनात पांडेजीचे वय अन काम ह्याच्या बद्दल एक अभिमानयुक्त आदर दाटून आला
थोड्याच वेळात नाश्ता आला व पांडेजी परत अंतर्धान पावले "अब आप सो जाईजे पांडेजी" असे सांगायला पटेलबाबू विसरले नाहीत नाश्ता झाला समीर जरा फ़्रेश झाला तेव्हा पटेल बाबू म्हणाले... ."चला कॉन्फ़रन्स करु".
" ओके सर" बाकी दोघे म्हणाले.
मुंबई
.डॉ.गणेश पाटील क्लिनिकलाच होते रात्र फ़ार झाली होती पण आजचा दिवस महत्वाचा होता, पक्यापण सिरियस होऊन बसला होता, गणेश कळवळुन बोलला" प्रकाश आज काही होईल का रे?"
प्रकाश बोलला "मला तर डॉक्टर व्हायला अजिबात आवडत नाही गणेश आधी बॅकग्राऊंड वर्क म्हणुन ३ महीने मेडीसीन चा अभ्यास करा तिच्यायला इतकीच खाज असती तर मेडीकल नसते का केले, आपण डिपार्टमेंट ला आहोत हेच साले कधी कधी विसरायला होते बघ!!!"
" झाले पाहीजे अजुन फ़क्त चार तासांसाठी........ मग आहेच डॉ.पाटील हे समुद्र सफ़रीवर गेले असता रॉयल क्रुझ शिप वरुन गायब झाले वगैरे प्रेस फ़ॉलोअप "
आता रात्रीचे २.३० झाले होते. आता प्रकाश ने त्याची सुटकेस उचलुन टेबलावर ठेवली वरकरणी भिकार दिसणारी ती मळकी VIP होती पण आत "भारत इलेक्ट्रॉनिक्स च्या अभियंत्यांनी कमाल करुन बनवलेले हार्डवेर अन डिफ़ेन्स च्या सॉफ़्टवेर इंजिनियर्स नी बनवलेले जबरदस्त सॉफ़्टवेर भरलेले होते.
प्रकाश ने हॉस्पिटल चे नेटवर्क डीटॅच केले व ह्या सुटकेस रुपी सी.पी.यु ला टच स्क्रीन टर्मिनल कनेक्ट केले. युनिट ऑन केले पाचच मिनिटात व्हेरीफ़िकेशन बीप झाला व दोघांनी आपापले डाव्याहाताचे पंजे टच स्क्रिन वर टेकले, हार्टबिट्स, घाम व फ़िंगरप्रिंट्स वरुन सिनियर एजंट्स प्रकाश काणे व गणेश पाटील व्हेरीफ़ाय झाले होते.
"दिल्ली आली काय?" सम्या इन्फ़ॉर्मलीविचारु लागला,
"थांब " गणेश काही म्हणायच्या आधीच कनेकशन एस्टॅब्लिश झाले होते.
देशकर साहेब बोलले, "वेल्कम एजंट्स जय हिंद"
"सर, ससा बोलला ते खरे आहे आम्ही समीरकडुन व्हेरीफ़ाय केले आहे"- पक्या
"तुम्ही सश्याला "क्लिनिकल ट्रायल्स ला " टाकले होते काय?- पटेल
"गरज पडली नाही सर, मागच्या वेळी "ट्रायल" पाहुन ससा भरुन पावला"
"लवकर आटपा रे, सश्याला बसवुन खाऊ घालणे आता आपल्या एजन्सीच्या बदनामीचा विषय झालाय"
"ओके सर, पण प्लिज कोर्ट कचेरी अन केसचा फ़ार्स चालु ठेवावा लागणार आम्हाला थोडा अजुन वेळ हवाय सर , प्लिज तुम्ही शेरशहा सोबत बोलुन घ्या" पक्या
"ते म्हणजे कसे सर एक नवे न्युरल सिरम इंजेक्ट केले आहे सश्याच्या ब्रेन मधे डायरेक्टली त्याचे सबकॉन्शस मेमरी लोब्स ऍक्टीव्हेट व्हायला अजुन २ दिवस जातील तरी आम्ही ते स्टेराईड्स देऊन देऊन एका दिवसावर आणलंय, अजुन खुप इन्फ़ो आहे सर त्याच्या डोक्यात ती मिळावी म्हणुन....., डी आर डी ओ च्या फ़ार्मासुटीकल टीम ला पण सिरम च्या परफ़ॉर्मन्स चे फ़ॉलोअप्स हवेत " गणेश चाचरत बोलला
" थांबा डॉक्टर, ससा मेला तर गजहब होईल जास्त रिस्क नको पण त्याच्या मेंदुतली पुर्ण माहीती पिळा बाकी काही नाही" देशकर साहेब
"साहेब, त्या घौरी च्या कोडचे काय झाले? मी तो मिळवला खरा पण डीकोड नाही करता आला मला तो" समीर
"समीर आपल्या आय.एस.आय च्या डबल एजंट नी ते एंडॉर्स केले आहेत. गुड जॉब"
"मी सोडवला आहे तो कोड सर,ते येडे अजुन जुनेच सायफ़र्स वापरतात,आपला एक माणुस चाणक्यपुरीत आहे त्याने ऍक्सेस कोड लॉजिक मॅनेज केले आहे होस्टाईल एंबसी मधुन त्याच्याच मदतीने हे झाले आहे, " (हा ड्रायव्हर व तो म्युझियम क्युरेटर नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन चे संगणक अभियंता!!!!!)
"मंडल ने त्यांचे टोटल कम्युनिकेशन ट्रॅप केले आहे" सरदारजी कौतुकाने बोलले!!!!!....
तेवढ्यात मंडल पण कॉन्फ़रंस मधे आला देशकर सर आहेत हे विसरुन एकदम एक्साईट होऊन बोलला "भैय्याजी आज तो पकडे ही जाते थे,अरे मी रोज होस्टाईल एंबसी पुढे काहीतरी कारणे काढुन रेंगाळायचो ना, आज एम.ई.ए ला मंथली रिपोर्ट द्यायला गेलो त तिथे तो नेहमीचा पठाण आला होता पाकीस्तानी डॉसियर घेऊन. मी बिचकलो होतो जरा. साला पिछे ही पड गया था, मला वाटले आता सिव्हिलियन पोलीस अलर्ट करावे लागतात ब्वा, पण मग माझेच खापर हलले हो, सरळ राजीव चौक मेट्रोस्टेशन च्या मुतारीत घुसलो, तिथे एकच आहे अन तिला पुढचे अन मागचे अशी दोन दारे आहेत, तरी बेट्या मागेच. मग सरळ सायलेंसर लाऊन शूट केला, प्रेत एन्क्लेव च्या मागच्या सर्व्हिस लाईन ला टाकलंय अंगावर दोन गांजाच्या पुड्या सोडल्यात त्याच्या ड्रग फ़ाईट वाटावी म्हणुन."
देशकर सर कौतुकाने बोलले "हा मंडल पाहीला की तरुणाइतले दिवस आठवतात मला, मी त्या एरीयाच्या डी.सीपी सोबत को-ऑर्डीनेट केले आहे मंडल. ड्रग्ज विकताना तो मारला गेला असे प्रेस बाउन्स करणार आहोत आपण, आता एंबसीला कळणार पण त्यांच्या, पण तो इश्यु नाही ते तसेही स्वतःच्याच सैनिकांची प्रेते ओळखत नाहीत अन ते आपल्याच पथ्यावर पडते बघ"
ते पुढे म्हणाले "पटेल साहेब तुम्ही अफ़गाण डायरी लवकर पुर्ण करा, इथला सी.आय.ए स्टेशन हेड रोज माझ्या ऑफ़िसात भिक्षांदेही करतोय."
"सर मी ते रिपोर्ट्स मेल केलेत तुम्हाला, स्पॅम बॉक्स मधे एरिक वाईझ ह्या नावाने आला असेल तो मेल तुमच्या, सिक्युर लाईन वरचा आहे, तुम्ही ऑफ़िस मेल वरच वाउन फ़ॉर्वर्ड करायला हरकत नाही.त्याचे काही हार्डलाईन फ़िक्सेशन आहे??"
प्रकाश म्हणाला "शिवाय दुसरा एक रस्ता आहे सर, उद्या त्यांच्या एका एजंट ला कुतुबमिनार ला यायला सांगा ऍज अ टूरिस्ट. पण व्यवस्थित ये म्हणाव, मागचा तर तिकडे पण सुट घालुन आला होता, प्रिस्क्राईब करा त्याला, रगर्स ची ३/४, लाल टीशर्ट अन टेनिस शुज, कॅमेरा विसरु नको म्हणाव लांब लेन्स लावलेला. तिकडे बलविंदर च्या हातुन तुम्ही ते हार्डकॉपी डीलिव्हर करुन टाका, त्यांना सांगा गो टू टूरिस्ट हेल्प सेंटर ऍट कुतुब ऍंड आस्क फ़ॉर गाईड बुक विथ सिरिज नंबर ४३,ती सिरिज लेटेस्ट आहे अन टूरिझम मिनिस्ट्री ने स्पेशल अमेरिकन पर्यटकांसाठी काढली आहे सो प्रोब्लेम होणार नाही शिवाय बलविंदर त्याला वैयक्तिक ओळखतो म्हणजे मिस्प्लेस होण्याचा पण चान्स नाही. पुढे त्यांची वकिलात अन त्यांची एजन्सी बघत बसे ते व्हाईट हाऊस किंवा लॅंग्ले पर्यंत कसे पोचवायचे ते"
"गुड आयडीया, बलविंदर कामाला लाग लगेच" बलविंदर लगेच कामाला लागला रात्रीतंन त्याला २००० पानाचे चोपडे एडीट करुन सी.डी बर्न करुन ती टीम पिअर्सन ला उद्या द्यायची होती.
"आमच्या इकडे थोडे शांत झाले आहे, आजकाल हेरगिरी बद्दल आमच्यावर जास्त शंका नाही ही एक गुड न्युज मला माझ्या लोकल अफ़गाण लिड ने दिली आहे" एके.
"एके, तुम्ही एंबसी सिक्युरीटी चांगली मेंटेन केलीत, पण आता सिझन चालू होणार बर्फ़ वितळले की, ह्या सिझन च्या २५० टीप्स आहेत एकंदरीत २५ तरी खात्रीच्या आहेत, नुसते एंबसी पुरते मर्यादीत राहु नका, थोडे बाहेर सरका, काबुल, कंदहार, हेरात, हेलमंड, जलालाबादेत सिव्हिल कपड्यात तुमच्या आर्म्ड कोव्हर्ट टीम्स तैनात करा, वकिलातीवर प्लान झालेला हल्ला हा सोर्स लाच टर्मिनेट झालाच पाहीजे, ह्या वर्षी मला वकिलातीवर एक एकही रंगाचा टवका उडालेला दिसायला नकोय ओके??"
"ओके सर, बी अश्युअर्ड"
"तुम्ही गोळा केलेली माहीती असणारे फ़ॅक्स मला मिळाले आहेत, सुरक्षेच्या कारणास्तव हे सिग्नल माल्टा व सायप्रस इथुन कार्टोसॅट -३ ट्रान्स्पॉंडर जी वरुन राऊट केले आहेत" बलविंदर
"रॉजर दॅट" इतरेजन....
कॉन्फ़रन्स संपायला आले तसे देशकर बोलले "पुढील ऍक्सेस चा कोड आहे बिंदुसार, अन सॅटेलाईट आहे रिसॅट, ओके??? ऍझिमथ्स तुम्हाला वेळेवर मिळतील , मॅसेज कोड मिळाल्यावर सेल्फ़ इन्सीनरेट होईल.... सोबत ह्या कॉन्फ़रन्स ची सगळी हिस्ट्री पण इरेज होईल ,फ़क्त हेडक्वार्टर च्या मेनफ़्रेम ला ही इन्फ़ो आहे, पुढच्या मिटींग चे एजंडा मी तिकडून जनरेट करुन घेईन" देशकर बरेच समाधानी वाटत होते,
१० १५ सेकंदांची शांतता तोडत समीर म्हणाला, "सर मला स्वीच ऑफ़ कराल प्लिज"
"हो, ठीक आहे कॅप्टन,आय अग्री यु नीड अ ब्रेक नाऊ " देशकर बोलले,
"एके, ह्यांच्या अंगकाठीचा एखादा गोरा अफ़गाण हाणा व कपडे वस्तु ह्यांच्या सहित डी.एन.ए प्लांट करुन "मुरिद मारुन टाका ,I want murid shahid Dead in a northern alliance raid by tomorrow evening, clear?"
व्हिडीओ कॉन्फ़रंसींग संपताच ते शांत बसलेल्या मनस्वी कडे वळले, व शांत पणे बोलले,
"तु तयार आहेस मनस्वी?
"हो सर"
"सिनियर केडर सगळे त्यांच्या ऑब्झर्वेशन मधे असतात म्हणुन, हे मोठे काम तुझे आहे, फ़्रेश आय.एफ़.एस कडे जास्त लक्ष नसते ओके बेटा?" हे म्हणत असतानाच त्यांनी एक पेनड्राईव्ह तिच्या हातात दिला व म्हणाले, पालम एयरपोर्ट ला सिक्युरीटी ला पेन ड्राईव्ह दाखव अन कोड सांग "जिजामाता" तुला डेटा कॅरी क्लियरंस मिळेल. जे.एफ़.के ला उतरली की तिकडच्या इमिग्रेशन ला पास करण्यासाठीचा कोड आहे "mattlock" बेटा एक वेळेस पुढचे २४ तास स्वतःचे नाव विसर पण हे शब्द विसरु नको. कळले तुला????
अतिशय शांत पण निश्चयी सुरात ती म्हणाली "ओके सर" ती निघुन गेली, सकाळी ३ ला तिची फ़्लाईट होती व गेल्या गेल्या तिला आपल्या देशाची कैफ़ियत यु.एन मधे मांडायची होती देशकरांनी नवा डेटा देऊन बलविंदर रवाना केला, टेबला वरचा फ़ोन उचलुन एक कॉल केला..
अमेरिका भेटीवर जाणा~या पी.एम च्या "पुष्पक " ह्या विमानातल्या एक्झिक्युटीव्ह लाउंज मधे रिंग झाली व फ़ोन उचलला गेला,हे विमान म्हणजे मॉडीफ़ाय केलेलं बोईंग ड्रिमलायनर होते, एयरफ़ोर्स वन च्या तोडीचे जगातले फ़क्त दुसरे विमान होते ते म्हणजे हे, ह्याचा एयर कोड होता आस्क-एफ़ म्हणजे अशोका फ़्लाईंग,
दिल्ली सेक्रेटेरियाट मधुन देशकर साहेब बोलले "थिस इज कीड स्पिकिंग टू द आस्क-एफ़, रिक्वेस्टींग पर्मिशन टू कन्व्हर्स विथ शेरशहा.... अप्लिकेशन कोड इज कणाद"
"अप्लिकेशन कोड व्हेरीफ़ाईड कनेक्टींग सिक्युर लाईन टू शेरशहा...."
"जयहींद देशकर साहेब बोला, धिस इज पी.एम स्पिकिंग"
"सर, मेघदुत घेऊन यक्षिणी निघाली आहे, तुम्ही परदेशात बोलले तर कालिदासाच्या नावाचा बोलवाला होईल. ओव्हर"
"ठीक्, मी तुम्हाला रिलेव्हंट कोड्स अर्ध्यातासात पोचतील अशी सोय करतो, तुम्ही फ़ेडरल स्पेशल सर्व्हिस स्टेशन कोड ००46398 ला बोलुन घ्या ,आपला कोड आहे कोहीनुर. ओव्हर एँड आऊट"
अर्ध्यातासात तिकडुन परवानगी येताच देशकरांनी दुसरा फ़ोन उचलुन एक कोड दाबला, पलिकडुन आवाज आला
"This is Fedral special services station code 0046398 verify and go ahead"
"this is kohinoor , Meghdoot on its way, requesting fedral security cover over your land"
"request and code verified. permission and security granted"
त्या दिवशी संध्याकाळी न्युयॉर्क च्या यु.एन बिल्डिंग मधे सदस्य देश स्तब्ध बसले होते, पाकिस्तानी राजदुत शुन्यात बघत होते, व खणखणीत आवाजात मनस्वी डॉसियर वाचुन दाखवत होती" दुस~या दिवशी पेपर मधे बातमी होती
"अतिशय वेगळ्या पद्धतीने भारताने आज पाक पुरस्कृत दहशतवादाचे पुरावे यु.एन समोर मांडले, जे कुठल्याही वरिष्ठ विदेशसेवा अधिका~याने न मांडता, नवख्या कु.मनस्वी बोस ह्यांनी मांडले!!!!!"
ह्या वेळी मनस्वी जेट्लॅग मुळे तिच्या ग्रॅंड कॉंटीनेंटल हॉटेलच्या खोलीत झोपी गेली होती ,
समीर आपल्या मुली सोबत खेळत होता नवरा "बॉर्डर वरुन "आल्यामुळे मिसेस खुष होती,
गणेश-प्रकाश ने नवे सिरम देऊन ससा अजुनच बोलता केला होता व नव्या माहीतीवर खुष होते,
बलविंदर एका ईमेल इन्वेस्टीगेशन मधे मश्गुल होता.
मंडल, कनॉट प्लेस मधे पोरी छेडत जुन्या कॉलेजच्या मित्रांसोबत खिदळत होता.
देशकर साहेब इंडीया इंटरनॅशनल ला बरेच दिवसांनी सहकुटुंब सहपरिवार जेवत होते.
अफ़गाणिस्तानातली भारतीय वकीलात साळसुद उभी होती, पटेल -एके व्हिस्कीचे घोट घेत पश्तु भाषेतले विनोद समजवुन घेत होते,
रतन मिश्रा अजुनही बुचकळ्यातच पडलेला होता.
भारतीय गुप्तहेर संस्थेचा एक नॉर्मल २४ तासांचा दिवस संपला होता.

Monday, 13 June 2011

आमच घर..... एक छोटा फ़ोटो ब्लॉगिंग प्रयत्न........

 
करवंदं वाटतायत नाही?........ थांबा, मंडळी हा आहे अस्सल सातपुड्यातला मेवा, परतवाड्याच्या जंगलातन आणलेली ही आहेत फ़्रेश जंगली जांभळे. दिसायला करवंदासारखी, पण जांभळे आहेत, गोड म्हणजे मरणाची गोड, हिच ती जांभळे जी "मधुमेही" लोकांना चालतात, बियांचे चुर्ण करतात ह्याच्या. आपल्या शहरी भाषेत कुठल्या "बेरीज" म्हणतात ह्यांना काय माहीत
 
आमच्या परसातले चिक्कु , आईने सहज म्हणुन टोचलेली बी आज बादल्या बादल्या चिकु देते आहे..... फ़ारच गोड, मस्त चिक्कु आहेत आमच्या आईला ती सिद्धीच आहे म्हणा, अगदी टाकाऊ असले तरी काही तरी टीकाऊ
बनवायची नजर आहे तिची.
झाड लहडणे काय असते, हे कदाचित ह्याच्यावरुन लक्षात यावं :) :)

हे कुठलंस पाम आहे, नाव मला ही नाही आठवत, खाली जो डबा आहे पत्र्याचा त्यात पहीले आमच्या गाईला कडबा-कुट्टी, ढेप वगैरे घालायचे, कपिला गेली अन हे रीकामे झाले, ह्याचा कल्पक उपयोग मातोश्रींनी असा केला आहे.
आमचे लॉन, वर्हाडी उन्हाळ्यात पण घर मात्र गारेगार राहते ते ह्याच्यामुळेच, कश्मिरी डायमंड्स जातीचे हे लॉन अनवाणी पायाने चालायचे म्हणुन उत्तम असते, थंड होते अगदी...

ही बेलफ़ळ, कवठासारखी कडक असतात आतला मगज पिवळा अन भयानक चिकट असतो, गोड असतो, आमची आई सरबत बनवते ह्याचे, मस्त असते, पोट बिघडले असता आम्हाला दिले जात असे . गाडी च्या बोनेट वर पडले तर फ़ुल डेंटीग पेंटींग चा चुना हमखास लागणारच!!!!

बेलाचे कोवळे फ़ुटवे, ह्याचा रंग पोपटी असतो, पुर्ण उन्हाळा पानगळ झाली की पावसाच्या सुरुवातीला हे फ़ुटवे फ़ुटतात, अन पुर्ण झाड गडद पोपटी होते, तासंतास बघत बसले तरी मन भरत नाही....

माझी छोटीशी वैयक्तिक लायब्ररी, उगाच आपले काहीतरी म्हणुन कलेक्शन केले आहे पुस्तकांचे, फ़ार प्रकांड नाही पण आवड म्हणजे राजकिय ऐतिहासिक वगैरे आहेत, काही कादंब~या आहेत, काही जर्नल्स आहेत, मला कुठलेही वाचन वर्ज्य नाही म्हणुन कदाचित माझे व्ह्यु पण बॅलंस्ड झाले, सगळ्यात खालच्या शेल्फ़ मधे एकाच ओळीत समग्र सावरकर साहित्य अन कार्ल मार्क्स चा साम्यवादाचा मसुदा आनंदात एकत्र नांदतो!!!!!!